एकच प्याला : टीकात्मक विवेचन

 



 

             राम गणेश गडकरी हे मराठी वाङ्मयात तीन नात्यांनी विख्यात झाले आहेत. कवी, विनोदी लेखक आणि नाटककार. या तिन्ही क्षेत्रातील त्यांच्या श्रेष्ठतेबद्दल त्यांच्या काळच्या व त्यांच्यानंतरच्या टीकाकारांनी विविध मते व्यक्त केली आहेत. तथापि अद्यापही त्यांच्या वाङ्मयकृती आतुरतेने वाचल्या जात आहेत व वाचकांच्या मनाची पकड घेत आहेत. गडकऱ्यांच्याइतका लोकप्रिय लेखक मराठीत अद्याप झालेला नाही हे त्यांच्या टीकाकारांसही मान्य करावे लागते. त्यांच्या सर्व नाटकांत 'एकच प्याला' महाराष्ट्राच्या अधिक परिचयाचे आहे ही गोष्टही सर्वमान्य आहे. 'एकच प्याला' रंगभूमीवर आणणारी गंधर्व नाटक मंडळी त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. बालगंधर्व आणि गडकरी ही दोन नावे आधीच विख्यात होती; पण 'एकच प्याला' च्या जन्मानंतर सिंधू, सुधाकर, तळिराम ही नावेदेखील आबालवृद्धांच्या तोंडी झाली. शेक्सपियरच्या पागां संबंधी असे म्हणतात की, ती पात्रे, प्रत्यक्ष होऊन गेलेल्या स्त्री - पुरुषांहूनही जगाच्या अधिक परिचयाची आहेत. मराठीत ज्या अगदी थोड्या  नाटकांस राष्ट्रीय संसारात इतके 'वास्तव' स्थान मिळाले आहे, त्यात एकच प्याला हे एक आहे.

एकच प्याल्याच्या जन्मकाळी

                    गडकरी यांचे प्रेमसंन्यास हे गद्य नाटक १९१२ साली रंगभूमीवर आले. गडकरी १९१९ च्या जानेवारीत वारले. 'एकच प्याला' रंगभूमीवर पाहण्याच्या आधीच ते इहलोक सोडून गेले. तरुण, तल्लख, भावनाप्रधान अशा गडकऱ्यांच्या मनावर त्यांच्या नाटयसंसाराच्या प्रारंभकाळी तत्कालीन नाट्याचार्यांचे दडपण असणे अगदीच साहजिक होते.

                  मराठी नाट्याचे मूळपुरुष सांगली येथील विष्णुदास भावे हे होते. यांची नाटके संपूर्णतपणे पौराणिक असत. खाडिलकरांच्यासारखा विद्वान आणि देशभक्त नटांकरिता नाटके लिहितो, कोल्हटकरांच्यासारखा डबल पदवीधर वकील नाट्यात काही नवीन करू इच्छितो, या गोष्टीचे तत्कालीन लोकास काही विलक्षण महत्त्व वाटत असे!  

  मानवी मनाचे स्थान :

                          सामाजिक प्रश्नाकडे पाहण्याचेही भिन्न भिन्न दृष्टिकोण आहेत. एकाच सामाजिक परिस्थितीचे आणि रूढीचे परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळे होतील. विशिष्ट सामाजिक रुढी प्रमाणेच विशिष्ट मानवी मन हाही नाटककाराच्या चित्रणाचा विषय आहे. पौराणिक नाटकात पौराणिक सत्यास आणि उदात्त वातावरणास येई. सामाजिक नाटकात वास्तवता आणि सुरधाप्रेम यास महत्त्व येई. अद्भुततावादी कथानकात - उदा. हरणार्थ, मूक नायक, मानापमान - सर्वच माफ. 

               मानवी मन हा आपल्या अवलोकनाचा, अध्ययनाचा आणि चित्रणाचा विषय करणारे नाटककार आणि नाट्यसंप्रदाय गडकऱ्यांच्या पूर्वी झालेही नाहीत. एखादी सामाजिक परिस्थिती रंगविताना देवल, आणि ऐतिहासिक प्रसंग रंगविताना खाडिलकर, नकळत आपल्या पात्राच्या अंतरंगापर्यंत शिरत. शारदा आणि इंदिराकाकू या मायलेकींची दुःखे रंगविताना देवल अन्तरंगापर्यंत  पोहोचले आहेत. तरुण पेशवा सवाई माधवराव याच्या मानसिक यातना रंगविताना खाडिलकरही तद्रूप झाले आहेत. तथापि दोघांच्याही चित्रणाचा विषय सामाजिक वा ऐतिहासिक प्रसंग होता; मानवी मन हा नव्हता. पण गडकऱ्यांच्या 'एकच प्याला' चा मद्य पाननिषेधावरील आणि विधवाविवाहावरील नाटक म्हणून अभ्यास करणे, म्हणजे शाकुंतलाचा 'प्रीति विवाहदुष्परिणाम' या विषयावरील नाटक म्हणून अध्ययन करण्यासारखेच होय. 

  गडकऱ्यांची अपूर्वता :

              काव्यमयतेच्या जोरावर त्यांच्या नाटकांत नाटकाचे सर्व गुण एकदम अवतीर्ण होतात! जिवन्त पात्रे, हृदयाचा ठाव घेणारी भाषणे हे गुण अशा कविनाटककारांच्या ठिकाणी सहजगत्या दिसत असले तरी प्रमाणबद्धता, नाट्यरचना आणि विनोद हे गुण काव्यमतेच्या पोटी येतातच असे नाही. यांतील पहिला गुण तर जवळ जवळ गणितशास्त्राच्या जातीचा आहे. इंग्रजी टीकावाङ्मयात तर त्यास नाट्याचे 'स्थापत्य' असेच नामाभिधान देतात! आणि दुसऱ्या म्हणजे विनोद या गुणाचे सार वस्तुनिष्ठ हे असल्याने आत्मनिष्ठ आणि भावनाप्रधान माणसे कित्येकदा या गुणास पारखी असतात. पण ती सर्वदाच पारखी नसतात, हे गडकऱ्यांच्यांच उदाहरणावरून सिद्ध आहे.

               हाडाचा भावनाप्रधान असूनही नाट्यरचनेच्या स्थापत्यात असाधारण प्रतिभा दाखविणारा शेक्सपिअरसारखा नाटयसृष्टीचा ईश्वर अर्थात विरळा. तथापि गडकऱ्यांच्या इतकी काव्यमयता, नाट्यकुशलता आणि विनोदशक्ती एकत्र आढळणे ही गोष्टदेखील दुर्मिळ होय. या दुर्लभ गुणसमुच्चयामुळेच गडकऱ्यांचे स्थान मराठी नाटककारांत असाधरण आहे. आणि या अभिनव सामर्थ्यामुळेच त्यांच्या समकालीनांस त्यांची जात ओळखणे जड गेले. 

एकच प्याला आणि खांडेकर -

                'एकच प्याला' तील पात्रे, उपकथानक, विनोद, औचित्य, अनौचित्य, वगैरेची निश्चिती करण्यापूर्वी त्यातील प्रेरक उद्देशाचा अथवा 'motif' च विचार केला पाहिजे. काव्यशून्य, बहिर्मुख, आण गद्यजीवी लेखक ज्या मार्गाने विषय, कथानक, पात्रे आणि उपकथा शोधतात, त्या मार्गाने गडकऱ्यांसारखे आत्मनिष्ठ आणि काव्यमय नाटककार शोधीत नाहीत. ' एकच प्याला' च्या जन्मकाळी - अशी एक दंतकथा प्रचलित होती की, सुप्रसिद्ध नट बालगंधर्व यांच्या अनेक राजविलासी भूमिकांनंतर त्यांस अत्यंत हालअपेष्टांची - पोटाकरिता दळणकांडण करण्याची - भूमिका देण्याची प्रतिज्ञा गडकरी यांनी बोलून दाखविली होती. 

                       'एकच प्याल्या' तील पात्रांचे उगम शोधताना श्री. खांडेकर यांनी पुढील उपपत्ती बसविली आहे. मुख्य पात्रे हे हृदय, दुय्यम पात्रे हे शरीर आणि गौण पात्रे हे कपडे, असे नाटकातील पात्रांचे रूपकात्मक वर्गीकरण ठरवून खांडेकर लिहितात," दुय्यम पात्रे नाटकात आवश्यक होऊन बसतात याचे कारण हेच आहे. अपमान झाल्याबरोबर सुधाकर उठला आणि गुत्त्यात गेला असे वर्णन कुणी केले तर त्यामुळे करुणापेक्षा हास्यरसच उत्पन्न होण्याचा संभव अधिक. सुधाकराच्या हातात दारूचा पेला आकाशातून पडणे अशक्य असल्यामुळे गडकऱ्यांना तो पेला देण्याकरिता  तळिराम निर्माण करावा लागला. अट्टल दारूबाजाला बायको नसली तर आपल्या मद्यपानाचे प्रयोग तो बिचारा कुणावर करणार? या कारणामुळे तळिरामाच्या जोडीला गीता नाटकात आली. दुर्यन पात्रांचे उरलेले त्रिकूट - रामलाल सुधाकराचा मित्र म्हणून, शरद सुधाकराची बहीण या नात्याने, आणि भगीरथ ' झणि दे कर या दीना' हा गुरुवर्य रामलाल यांचा उपदेश शरदचे पाणिग्रहण करून अमलात आणण्याच्या सदुद्देशाने - या नाटकात संचार करीत असते."

           श्री. खांडेकर, हे वर्गीकरण करताना चिकित्सकपेक्षा हास्यकारकतेकडेच आधिक लक्ष देत आहेत की काय असा भास होतो. परंतु 'मूकनायका' च्या कथानकासारखा अस्वाभाविक आणि विचित्र कथानकात पात्रे ज्या वाटांनी गोळा होतात, त्या वाटांनीच 'एकच प्याल्या' तील पात्रांचे मूळ शोधू गेल्यास अशीच फसगत होणार. उलट गडकऱ्यांचे प्रकृतिवैशिष्ट्य ध्यानी घेतल्यास 'एकच प्याल्या' च्या विषयासंबंधी, संविधानकासंबंधी आणि पात्रासंबंधी काही वेगळाच बोध होतो.

एकच प्याल्याचा विषय :

          'एकच व्याल्या'  चा मुख्य विषय एका पाणिदार, बुध्दिमान आणि सरळ अशा पुरुषाची शोककथा - ट्रॅजेडी - हा होय. कथानकातील मूळ बीजे, त्याला लाभणारे स्वाभाविक खतपाणी, त्यातून तयार होणारा अपरिहार्य दुर्विपाक या सर्वांना नेमका लागू पडेल असा शब्द 'ट्रॅजेडी' हाच होय. त्याला नायकाच्या अधःपाताची हकीकत म्हणावी तर पतितासंबंधी वाटणारा अनादर आपणांस सुधाकरासंबंधी वाटत नाही. ही नायकाच्या ' दुर्दैवा' ची हकीकत म्हणावी तर सुधाकराच्या आपत्तींची जबाबदारी सर्वस्वी दैवावर लोटता येत नाही. सत्प्रवृत्त आणि गुणवान व्यक्तींवर ओढवणाऱ्या आपत्तींचा स्वभावधर्म ज्यास अवगत असेल त्यासच ' एकच प्याला' तील कथानकाचा रोख सुसूत्रपणे ध्यानात येईल. अशा व्यक्ती आणि त्यांजवर परिस्थितीचे होणारे परिणाम हा गंभीर वाङ्मयाचा फार प्राचीन काळापासूनचा विषय आहे. ओढे, नद्या आणि समुद्र या सर्वांच्या पाण्याला गतीही असतेच, पण प्रत्येकाच्या गतीचे नियम वेगळे ठरत असतात. 

              'एकच प्याल्या' चा पहिला प्रवेश हा गडकऱ्यांच्या वाढत्या नाट्यतंत्रप्रभुत्वाचा द्योतक आहे. त्यात प्रमुख पात्रांचा सुस्पष्ट आराखडा, गौण पात्रांचा खुबीदार परिचय, भावी आपत्तीची अशुभ चिन्हे वगैरे साहित्य तर आहेच; पण नायकाच्या गुणांची आणि मर्मस्थानांची माहितीही गडकऱ्यांनी अत्यंत वाकबगारपणे ऐन ओघात आणून दाखविली आहे. 

            बुध्दिमान, कर्तबगार, मानी, हौशी आणि प्रेम असा पती; सुस्वरूप, भक्तिमान, भाबडी आणि पुत्रसुखाच्या वाटेवर असलेली अशी पत्नी; रामलालसारखा थोर विचारांचा बंधुनिर्विशेष असा ऋणानुबंधी; संपन्न माहेर! अशा या मध्यमवर्गीय सुखसागरात कोठे कोपऱ्यात प्रक्षोभ असेल तर तो रामलालभाई परदेशात निघाला म्हणून आणि गृहलक्ष्मी प्रसूतीकरताच चार दिवस माहेरी जाणार म्हणून! सुधाकरासारखा सुदैवी आणि आनंदी जीव अशा गोड आपत्तीची व आपल्या पत्नीच्या मधुर कारुण्याची चेष्टा करतो ते प्रेक्षकांना साहजिकच वाटते. अभिजात पति - पत्नीची परस्परांविषयीची कोवळीक, स्वसुखनिरपेक्ष रामलालची त्या उभयतांच्या कल्याणाविषयीची दक्षता, सद्गुण आजि सद्भाग्य यांचा त्या सुखी संसारात सुटलेला सुगंध आणि त्यांतूनही सिंधूच्या कांक्षेखोर अन्तर्मनात आणि रामलालच्या वेदान्ती मनात पडलेल्या भावी दुर्गतींच्या छाया, या सर्वांच्या करूण - रम्य मीलनामुळे हा बहारीचा प्रवेश उत्तररामाच्या प्रथम प्रवेशाची आठवण करून देतो.

             सिंधूच्या गंगा - जमुनांची थट्टा करता करताच सुधाकर रामलालचे ऋणानुबंध एकवितो; व त्यातच स्वतःची व आपल्या बालविधवा भगिनीची हकीकत निवेदन करतो. रामलालच्या प्रयाणामुळे आपल्यालाही बाल्यापासूनचे ब्रम्हांड आठवत आहे, हा त्याच्या सांगण्याचा रोख आहे. रामलाल तर सिंधूसारखा तत्पर पतिव्रतेलाही सुधाकराला सांभाळण्याविषयी परोपरीने सांगतो. या सर्व प्रकारात या प्रेमळ मंडळींचा प्रेमळपणा तर आहेच; पण भावी आपत्तींची गुप्त सूचनाही आहे. पहिल्या अंकातील "लागे हृदयी हुरहुर । अजि ।" या पदापासून तो तिसऱ्या अंकातील " शंकाहि नाही कालि ज्या । दुर्गति जवे ये तदा ।" येथपर्यंत गुप्तपणे वाट कापणाऱ्या आपत्तींची चोर - पावले प्रारंभीच्या नंदनवनातही, कनोसा घेणारास ऐकू येतात. या आगामी आपत्तींचे मूळ केवळ दारूत नाही, केवळ दौर्बल्यात नाही, केवळ दैवाच्या लहरीतही नाही. ते कशात आहे ते शोधणे हा मानवी मनाचा सनातन उद्योग आहे; आणि ते ज्या मनःपिंडाच्या आणि परिस्थितीच्या सान्निध्यात जीव धरते, त्यांचे चित्रण करणे हा गंभीर नाट्याचा अथवा ट्रॅजेडीचा सनातन विषय आहे. सुधारणावादी, वास्तववादी, कार्यकारणवादी वा अद्भुतवादी यांपैकी कोणत्याही दृष्टीकोणाने पाहिल्यास अशा दुर्निवार शोककथेचे धागे उलगडत नाहीत.

सुधाकरचा एकलेपणा :

              तळिरामाची सदर शोककथेत योजना, सुधाकराच्या हाती दारूचा पेला द्यायला पाहिजे एवढ्याकरिता आहे, ही कल्पना जितकी चुकीची आहे तितकीच ' एकच प्याल्या' तील दारूचे प्रवेश हे " गंभीर कथेत" " गाढवाच्या गोंधळासारखे" दिसतात, ही चुकीची आहे. तळिराम नसता तरीही सुधाकर दारूकडे वळलाच असता. सुधाकर दारूकडे वळतो तो केवळ एखाद्या भिकार माणसाच्या बदमसलतीमुळे नव्हे. सुधाकराचा अध:पात हा सज्जनाने दुर्जनाची मैत्री केल्याचा परिणाम नव्हे, तर सज्जनांना स्नेहशून्य अशा अवस्थेत जो भेसूर एकलेपणा अनुभवावा लागतो त्याचा परिणाम होय. आजच्या आपल्या समाजात कोणत्याही व्यवसायात, आणि विशेषतः कोर्टाच्या वातावरणात सुधाकरासारख्या 'रत्नाला' , जो भेसुर एकान्त, जी माणसांनी गजबजलेली मसणवटी वाट्याला येते तिच्यातून सुटका आत्महत्या, कर्मसंन्यास, किंवा दारू याखेरीज कशानेही नाही. हेच दुःस्वप्न रामलालला त्याच्या प्रयाणकाळी स्पष्टपणे दिसले होते, - आणि सिंधूच्या स्त्रीसुलभ अन्तर्दृष्टीला अस्पष्टपणे भेडसावीत होते.

             आणि येथूनच लेखकाच्या प्रकृति वैशिष्ट्याबरोबरच मानवी मनांचे प्रकृतिवैशिष्टय लक्षात घेतले पाहिजे. ज्या अपमानामुळे आणि सहानुभूतिशून्य वातावरणामुळे सुधाकर आत्महत्येच्या गोष्टी मनात आणतो व अखेर विसर पाडावा म्हणून सर्वस्वनाशक मद्याचा पेला हाती घेतो, त्या वातावरणाचा परिणाम प्रत्येकावर सारखाच होईल असे नाही. एखाद्याने तो अपमान गिळून टाकला असता. दुसऱ्या एखाद्याने जमलेल्या जमावर तडफेने लाथ मारून अन्य व्यवसाय पत्करला असता. पण सुधाकर या टणक जातीपैकी नव्हता. आणि कोणाला उपरिनिर्दिष्ट टणक जाती अधिक पसंत झाल्या तरी ही मळखाऊ आणि हिणकस माणसे काव्यविषय होऊ शकली नसती खास. उदार माणसे जेव्हा औदार्यामुळेच दुःखे भोगतात, सरळ माणसे जेव्हा सरळपणामुळे गोत्यात येतात, भक्तिमान भार्या जेव्हा पतिभक्तीमुळेच पतीचेही रक्षण करू शकत नाहीत आणि आपलेही सुख मिळवू शकत नाहीत, तेव्हाच विनाशगर्भ -  ट्रॅजिक - परिस्थितीचे चित्र कवी रंगवितो, आणि तिच्या मूळ कारणाचा विचार तत्त्ववेत्ता करतो.

              तथापि सुधाकरासारखा सरळ आणि गुणी मनुष्य ज्या वातावरणात वाढत होता त्या वातावरणाचे चित्र हाही अशा शोककथेचा एक अवश्य भाग असतो तसेच सुधाकराच्याच व्यसनाचा त्याच्याहून हिणकस मनावर कोणता परिणाम होतो हे दाखविणेही क्रमप्राप्तच होते. मिश्रण हे कलेत विरोधी पार्श्वभूमी म्हणून तर उपयोगी असतेच, पण जीवनही असेच विषम आणि मिश्र नाही काय? तळिराम आणि त्याचे निशाचर 'गण' यांचे 'एकच प्याल्या' तील स्थान हे अशा प्रकारे सृष्टिक्रमाशी आणि दुनियेच्या संमिश्र रंगाशी संबद्ध व सुसंगत आहे. 

नाट्यविषयाचे थर :

               नाटकातील विषयाचे एकाबाहेर एक असे वर्तुळासारखे थर बनतात. त्यातील गाभा म्हणजे बाजारी, निगरगट्ट आणि मठ्ठ अशा जगात मानी आणि सरळ मनाचा होणारा कोंडमारा. त्याबाहेरील थर म्हणजे अपमान आणि एकलेपणा यांचा विषारी दाह सह्य व्हावा म्हणून पत्कलेला तोडगा व त्या तोडग्याने आपल्या स्वभावधर्माला धरून घेतलेला सूड. त्याच्या पुढील थर म्हणजे महाराष्ट्रीय मध्यमवर्गाच्या विविध प्रतिनिधींचे संविधानकाच्या संदर्भात चित्रण. सुधाकर, सिंधू, रामलाल यांजसारखी अभिजान सुसंस्कृत मंडळी; भगीरथ, शरद यांसारखे जवळजवळ त्याच पातळीतील पण दुर्दैवाच्या खाच - खळग्यात रुतलेले तरुण जीव, तळिरामसारखा बुध्दिमान पण कोडगा कारकून, त्याच्याशी मंगळसूत्राने बांधली गेलेली गीतेसारखी सरळ पण सिंधूच्या मानाने, अनभिजात, ओबडधोबड महाराष्ट्रीय मुलगी; आर्यसंस्कृतीच्या, देशभक्तीच्या, टिळक - आगरकरांच्या गोष्टी ऐकतच आधुनिक जीवनाच्या आडगल्लीत येऊन थडकलेले तळिरामाचे स्नेही; श्रीमंतीच्या तटबंदीआड सुरक्षित संभाळले गेल्यामुळे दुनियेच्या सुधाकरांना आणि तळिरामांना सारखेच दुरावलेले सिंधूचे प्रतिष्ठित माहेरवाले! --- या विविधरंगी आणि शंभर टक्के वास्तव अशा मध्यमवर्ग - चित्रापलीकडे, महाराष्ट्र - महाराष्ट्र तो कुठे आहे? भूतकालीन शिवराज्य, भविष्यकालीन स्वराज्य, पुस्तकातच पाहिलेले मजूरजग यांच्यासंबंधी बोलणारे आणि लिहिणारेही याच चारपाच थरांत कोठे तरी घुटमळत असतात. 

              आधुनिक मध्यमवर्गीय महाराष्ट्राचे एक अन्नभेदी आणि स्वयंपूर्ण चित्र हे 'एकच प्याल्या' चे स्वरूप टीकाकार घ्यावे तितके ध्यानात घेत नाहीत. अशा चित्रात प्रत्यक्षाप्रमाणेच संभाव्य आणि ध्येयभूत जगाचेही चित्र येणे अत्यावश्यक असते. व त्या कल्पनाराज्याला भरपूर वाव देण्याकरिताच गडकऱ्यांना रामलाल उभा करावा लागला आहे. मातृभूमी - संबंधी मनात उसळणारे विचार; प्रचलित सामाजिक, राजकीय, ध्येयवादासंबंधी मनात येणाऱ्या कल्पना; ध्येयवादी म्हणून मिरवणारांचा ढोंगीपणा; स्वतःच्या ध्येयवादासंबंधी वाटणारा विश्वास आणि अविश्वासही; मोह आणि त्याग या दोहोंची गडकऱ्यांसारख्या जिवंत आणि प्रत्यक्षाप्रमाणेच संभाव्य आणि ध्येयभूत जगाचेही चित्र येणे अत्यावश्यक असते. व त्या कल्पनाराज्याला भरपूर वाव देण्याकरिताच गडकऱ्यांना रामलाल उभा करावा लागला आहे. मातृभूमीसंबंधी मनात असळणारे विचार; प्रचलित सामाजिक, राजकीय, ध्येयवादासंबंधी मनात येणाऱ्या कल्पना; ध्येयवादी म्हणून मिरवणारांचा ढोंगीपणा; स्वतःच्या ध्येयवादासंबंधी वाटणारा विश्वास आणि अविश्वासही; मोह आणि त्याग या दोहोंची गडकऱ्यांसारख्या जिवंत आणि काव्यात्म मनाला वाटणारी दुर्दम्य ओढ; या सर्व कोंडलेल्या वाफेला वाट रामलालशिवाय कोण देणार? 'एकच प्याल्या' चा विषय एका वकिलाची जाणारी, येणारी, आणि फिरून जाणारी सनद एवढाच असता, अथवा एका दुर्बल मनाची व्यसनाधीनता एवढाच असता, अथवा एका दुर्बल मनाची व्यसनाधीनता एवढाच असता, तर खांडेकर किंवा शि. गो. भावे म्हणतात त्याप्रमाणे त्या नाटकातून बऱ्याच पात्रांना, बऱ्याच प्रसंगांना आणि बऱ्याच भाषणांना रजा देता आली असती. शिवाय आति आधुनिक तंत्राप्रमाणे पाच-सहा पात्रांत नाटक आटोपून पैशाची बचत आणि आधुनिकतेची जोडही झाली असती! परंतु त्यात गडकऱ्यांच्या मनश्वक्षूपुढे तरंगणारे संमिश्र आणि गूढ चित्र मात्र उभे राहिले नसते! तीच गोष्ट त्यांच्या असंबद्ध म्हणून निंदिल्या गेलेल्या अवखळ विनोदी प्रवेशांची होय. ट्रॅजेडी हे अयशस्वी ध्येयवादाचे आणि आत्यंतिकतेचे चित्र असते. जो आत्यंतिक ध्येयवाद दुर्भेद्य आणि विषमबल परिस्थितीशी टक्कर घेऊन पराभूत होतो, तो लगेच ढोंगी जगापुढे आणि त्याच्या ढोंगी नीतीपुढे मान तुकवतो असे मात्र नव्हे. अर्थात अशा दुःखान्त नाट्य - चित्रात ध्येयवाद सुळावर चढविता चढविता त्याबरोबरच ढोंगी दुनियेचेही पाच पाट काढून धिंड काढावी लागते. ही धिंड अशा शोककथांतूनही मोकाट सुटलेल्या निर्गल उपरोधाशास्त्राकडून काढली जाते. आर्यमदिरामंडळ, तळिरामाचे प्रेमावरील प्रवचन, खुदाबक्षाचे गीता प्रवचन, डॉक्टर - वैद्यांचा अतिरंजित अहंकार या सर्व प्रसंगांत केवळ भरमसाट विषयान्तर आणि पोरकट विनोद आहे असे म्हणणाऱ्या मंडळींना अशा नाटकाचा नितान्त संकीर्ण आणि गूढ असा हेतूच लक्षात आलेला नसतो. ज्या जगात सोन्यासारखे सुधाकर दारूकडे वळतात, रामलालसारखे विद्वान, कोट - बूटधारी संन्यासी बनतात, शरद - भगीरथांसारखे कच्चे आणि अतृप्त जीव झुरत झिजत जगतात, त्या जगात अनेक ठिकाणी काही तरी कुजत सडत असलेच पाहिजे. आणि या कुजत कोपऱ्यांचे दर्शन घडविणे हा अशा शोककथांचा एक अपरिहार्य भाग होऊन बसतो.

          हॅम्लेट नाटकातील पोलोनियसचा पायघोळ लोचटपणा, हॅम्लेटचा स्वतःच्या प्रियेच्या मुखड्यापासून तो मसणवटीच्या कवटीपर्यंत सर्वत्र स्वैरसंचार करणारा औपरोधिक विनोद, नाटकातील छोट्या नाटकात वक्रोक्तिरूपाने येणारे एकनिष्ठेसंबंधीचे व्याख्यान वगैरे सर्वच गोष्टींचा संबंध हॅम्लेटच्या उदात्त - गंभीर ध्येयवादाशीच आहे.

वस्तुनिष्ठ चित्रण :

             एकच प्याल्याच्या कथानकातील 'एकसूत्रत' लक्षात घेण्यास जिवन्त ऐक्य आणि निर्जीव सुटसुटीतपणा यांतील अंतर ध्यानी घेणे जरूर आहे; व त्याकरता संसाराचे वा समाजाचे आकलन 'तद्रूप' होऊन करणाऱ्या 'कवि - मना' ची घडण आणि त्याच समाजाचे आकलन बहिर्मुख राहून पुस्तकद्वारे करून घेणाऱ्या पुस्तकी अथवा गद्य मनांची घडण यांतील अंतर लक्षात घेतले पाहिजे. गडकऱ्यांच्या अंगी हे तद्रपू होण्याचे सामर्थ्य एवढे होते की,' एकच प्याल्या' तील अगदी परस्परविरोधी पात्रेही त्यांच्याच मनाची एक बाजू दाखवीत आहेत असा भास होतो. सुधाकर म्हणजे मानी मनाचे, तल्लख बुद्धीचे, उतावीळ वृत्तीचे गडकरीच होत, रामलाल म्हणजेही भावनावशतेमुळे ठेचाळलेले, मानी मनात दुखावून गंभीर झालेले, तल्लख बुद्धीला वेदान्ताकडे फिरविण्याचा यत्न करणारे गडकरीच होत; फार काय अखिल कोमल वृत्तींचा मुहूर्तमात्र संन्यास करून वस्तुमात्रभेदक विनोदाचा आणि विकट हास्याचा आश्रय करणारे गडकरीच  तळि रामचा हिडिस पण पराक्रमी मुखवटा चढवून कित्येक प्रवेश रंगवीत आहेत की काय असाही भास होतो. आणि गडकऱ्यांची बुद्धी आणि प्रतिमा कितीही तेजस्वी असली तरी त्यांच्यातही जो संकोच, जो भिडस्तपण, जो भोळसरपणा, जे मनोदौर्बल्य होते त्यांचेच चित्र त्यांनी भगीरथासारख्या सामान्य पात्राच्या द्वारे काढले असे वाटते. 

            आत्मनिष्ठ प्रतिभा आणि वस्तुनिष्ठ प्रतिभा यांत आपण अनेकदा दुर्लेघ्य द्वैत मानीत असतो. तथापि आत्मनिष्ठ मने त्यांचातील तद्रूप होण्याच्या सामर्थ्यामुळे पुष्कळदा वस्तुनिष्ठ मनाहूनही आधिक स्पष्ट वस्तुचित्रे अथवा वास्तव चित्रे रेखाटतात. आत्मनिष्ठ कविमने नाटयरचनेच्या फंदात सहसा पडत नाहीत; व एकदा मनापासून पडलीच तर 'गद्य' मनाहून अत्यंत सुस्पष्ट अशी नाट्यचित्रे रेखाटतात.

एकच प्याल्याकडे पाहण्याची दृष्टी :

        एका थोर मनाचे व एका अवनत समाजाचे संमिश्र आणि भीषण चित्र या दृष्टीनेच ' एकच प्याल्या' तील ' प्रस्तुत - अप्रस्तुत' , उचित - अनुचित', ' स्वाभाविक - अस्वाभाविक' भाग ठरवावे लागतील. आणि हे ठरविताना प्रतिबिंबित होणाऱ्या संसारचित्रांतील विशिष्ट प्रकारचा एकसूत्रीपणा जसा समजावून घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे भीषण नाट्याच्या कक्षेत येणाऱ्या मानवी घटनांचे कायदेदी समजावून घेतले पाहिजेत. भीषण नाटय अथवा हा वाङ्मयप्रकारच इतका अद्भुत आहे की तो अस्तित्वातच का यावा याचे साहित्यशास्त्रज्ञांना अनेकदा गूढ पडले आहे! प्रत्यक्ष सृष्टीतही चांगली माणसे चांगले करायला जाऊन वाईट करून बसतात.

                येथ एक नवलावो ।

                जो जो कीजे उपावो ।

                तो तो अपावो ।

                होय तें ऐक ॥

असे ज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटले आहे. असे का व्हावे? आणि समजा, प्रत्यक्ष सृष्टीत तसे होत असले तरी फिरून काव्यसृष्टीतही या बिघडलेल्या संसारांची आणि पराभव पावलेल्या पुरुषकारांची चित्रे कशाला? आणि विकत दुःखानुगामी साहित्यकाने अशी चित्रे रेखाटलीच तरी कवींना अव्यवहारी आणि स्वतःला शहाणीसुरती समजणारी माणसेही वेळ आणि पैसा खर्चून ही चित्रे पाहात रात्रीचा दिवस का करतात? 

भीषण नाट्य ऊर्फ ट्रॅजेडी :

        ' ट्रॅजेडी' उर्फ ' दुःखपर्यवसायी नाटक' या वाङ्मयप्रकाराचे मूळ प्राचीन ग्रीक वाङ्मयापर्यंत पोहोचविण्यात येते. इस्किलस्, सॉफॉक्लिस , यूरिपायडिस या विख्यात ग्रीक नाटककारानंतर या क्षेत्रात ऐकू येणारे विख्यात नाव म्हणजे रोमनी ट्रॅजिडियन्से सेनेका याचे. आणि त्याच्यानंतर जगत्विख्यात झालेले नाव म्हणजे आंग्ल नाटककार शेक्सपियर यांचे. ट्रॅजेडी या वाङ्‌मय प्रकाराची चर्चा करताना ज्या विख्यात ग्रीक महर्षींची वचने आद्यसूत्रे म्हणून पुढे ठेवावी लागतात, तो म्हणजे अरिस्टॉट्ल हा होय. तथापि महर्षी  अरिस्टॉट्ल झाला तरी ' ट्रॅजेडी ' कशी लिहावी याचे नियम सांगत नरून ' कशी लिहिली जाते ' ती परंपरा सुत्ररूपाने सांगत आहे, असे म्हणणेच ऐतिहासिकदृष्ट्या अधिक शास्त्रशुद्ध होईल. अर्थान ट्रॅजेडीचा आद्य प्रवर्तक ॲरिस्टॉट्ल नसून ग्रीक समाज आणि तत्त्वविचार हाच होय. म्हणूनच ज्यांना या प्राचीन आणि गंभीर रंजन - प्रकाराचा विचार करावयाचा असेल ते अरिस्टॉटल पोथीपासून सुरुवात करित नाहीत, नित्शेसारखे ' आर्ष ' तत्त्ववेत्ते तर ॲरिस्टॉट्ल यासही ट्रॅजेडीचे रहस्य पुरतेसे उलगडले नाही असे मानतात. ट्रॅजेडीरूप महानदीचे मूळ, अरिस्टॉटलसारख्या ऋषीच्या कुळातही कुळातही पुरते सापडत नाही, एवढ्यावरून हा विषय अथवा असाध्य आहे असे मानण्याचे कारण नाही. जो विषय पोथ्यापुस्तकांनी आटोक्यात येत नाही, तो बहुधा जीवनग्रंथाच्या साहाय्याने सुगम होतो. ग्रीक मन हे आज आपणांस कितीही ' दूरस्थ ' वाटत असले तरी ते मानवी मनाचाच एक भाग होय. 

           ' ट्रॅजेडी ' शब्दाचे भाषान्तर दुःखपर्यवसायी नाटक या शब्दाने मराठीत बरीच वर्षे होत आहे. इतरही शब्द प्रतिशब्द म्हणून रुढ आहेपण त्यांतही दुःख, शोक, कारुण्य वगैरेसच प्राधान्य दिले गेले आहे. तसेच मराठीतील विविध प्रतिशब्दांत पर्यवसान, अन्त या कल्पनांचा अन्तर्भाव बुद्ध्या केला जातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सदर नाट्यप्रकाराचा जन्मसंबंध ग्रीक नाटयाशी जोडला जातो. या सर्वच अर्थांचा आणि कल्पनांचा ' ट्रॅजेडी ' शी निश्चित आणि निकट संबंध आहे हे खोटे नाही. तथापि या विविध कल्पनांशीच थबकल्याने  'ट्रॅजेडी' त अन्तर्भूत असलेल्या आणखी काही कल्पनांकडे दुर्लक्ष झाले आहे.

दुर्लक्षिलेला भाग :

          ' ट्रॅजेडी' या नाट्यप्रकाराचा संबंध 'करुणा' हूनही 'भयानका' शी अधिक आहे. व नाटकाच्या अन्तावरूनच केवळ हा प्रकार ठरत नसून नाटकाच्या प्रारंभापासूनच ट्रॅजेडी आणि कॉमेडी या वेगळ्या असतात. व म्हणूनच या प्रकारास 'दुःखपर्यवयासी नाटक' असे म्हणण्याऐवजी ' भीषण नाट्य' असे म्हणणे अधिक अर्थवाहक होइल. तसेच या प्रकाराचे मूळ आणि ठळक नमुने आपण पाश्चात्य वाङ्मयात शोधतो हे युक्तच असले, तरी त्यामुळे विशिष्ट जमिनीतच ही रसिकरंजक विषवल्ली उगवते अशी चुकीची कल्पना आपण करून घेतो. याला आणखी एक कारण म्हणजे आपल्या देशात दुःखपर्यवसायी नाटके लिहिण्याचा प्रघात नव्हता हे होय. पण ट्रॅजेडीचा प्राणभूत भाग हा 'ग्रीस' सारख्या लहानशा देशात अथवा 'पोएटिक्स' सारख्या लहानशा ग्रंथास मावण्याइतका लहान नाही. तो अखिल मानवी जीवनाला व्यापण्याइतका मोठा असल्याने कोणत्याही वाङ्मयात याची बीजे आढळतातच. आपल्याकडे दुःखान्त नाटके नव्हती, एवढयामुळे आपल्या वाङ्‌मयात ट्रॅजेडीचा विचार कर्तव्य नाही अथवा त्यात ट्रॅजेडीची बीजे आढळत नाही, अशी कल्पना करणे चुकीचे होय.

         शाहनाम्यासारख्या वीरकथेतील सोहराब आणि रुस्तुमची कथा इतकी लोकप्रिय का होते, हे ठरवितानाही 'ट्रॅजेड' च्या मूलतत्त्वांचाच विचार करावा लागेल. रामायण, महाभारत, शाहनाना यांसारख्या ज्या काव्यांना आपण राष्ट्रीय महाकाव्ये, इतिहासी, वीररसप्रधान काव्ये वगैरे नावे देतो, त्यांतही इतक्या स्थकी दुःखपर्यवसायी कथा आढळतात की, आधुनिक भावगीतकारांना रडवे म्हणणारे वीर अज्ञानीय ठरावे! पण या सर्व विपरीततेचा अर्थ एवढाच आहे की, वीरांच्या कथांत आणि प्रत्यक्ष घडलेल्या राष्ट्रीय इतिहासातही भीषण आणि दुःखमय भागास फार मोठे स्थान देणे अपरिहार्य होऊन बसते! इराणसारख्या देशात नाटकेच नसली, आणि हिंदुस्थानसारख्या देशात दुःखपर्यवसायी नाटके शास्त्रनिषिद्ध असली, तरी तेथील वाङ्मयातही ट्रॅजेडीची बीजे भरपूर होती. याचे कारण भीषणनाट्याचे वा काव्याचे मूळ विशिष्ट काव्यशास्त्रात नसून मानवी मनात आहे.

मानवी मनोरचनेचा नियम :

        सज्जनांच्या आणि थोर पुरुषांच्या हालाचे वर्णन ऐकणे हे अत्यंत श्रेष्ठ प्रतीच्या मनोरंजनाचे साधन म्हणून आज हराजो वर्षे मानण्यात आले आहे. भारतवर्षात या मानवी प्रवृत्तीस मुरड घातली गेली ती केवळ नाट्यापुरतीच . एरव्ही या मानवी अभिरुचीला धरून अनेक कथा व काव्ये अनेक शतके लि दिली जात आहेत. पांडवांचे हाल, सीतेचा वनवास, अग्निदिव्य आणि अखेर भूमिप्रवेश, रुस्तुम आणि सोहराब यांसारखया राष्ट्रवीरांचे अकारण व दारूण अन्त या कथा राष्ट्रीय मनावर जितक्या खोल खोदल्या जातात तितक्या सुखी आणि आणि सुदैवी राजोराण्यांच्या कथा खोदल्या जात नाहीत. भीषण - नाट्याचा विचार करीत असता नाट्यरचनेच्या नियमाहूनही मानवी मनोरचनेचा हा नियम ध्यानात धरणे अधिक आवश्यक आहे.

         आपण आज बुद्धीवाद, प्रयत्नवाद, आणि सुधारणावाद यांचा अभिमान बाळगतो. ' एकच प्याला' तील पात्रांचा आणि कथेचा विचार करताना कित्येक टीकाकारांनी याच कसोट्या लावून त्याचे गुणदोष ठरविले आहेत. पण बुध्दिमान आणि कर्तृत्ववान मनुष्य सकृद्दर्शनी अकारणच अपयश व क्लेश यांचा धनी होतो. 

ट्रॅजेडी विरुद्ध सुधारणावाद :

        कोणत्याही दुःखाला अगर अपयशाला , व्यक्तीतील अगर समाजातील दोष होय; आणि हा दोष दाखविणे व अशा चित्रणाच्या द्वारे तो दूर करण्यास मदत करणे, हे वाङ्‌मयाचे ध्येय होय, ही आपण जवळ जवळ गृहीतकृत्ये समजतो. परंतु ही गृहीतकृत्ये तात्पुरते उद्देश डोळ्यांपुढे ठेवून लिहिलेल्या वाङ्‌मयालाच पुरी पडतात. दारूच्या . व्यसनापायी सुधाकरसारख्या बुध्दिमान आणि सुस्वभावी पुरुषाचा नाश होतो.बुद्धिमान आणि सुस्वभावी असा एक आधुनिक नायक दारूकडे का वळतो? धर्मराजासारखा महात्मा दौपदीसारख्या साध्वीला पणाला का लावतो? आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे दौपदी, सीता आणि राम यांसारखे स्त्रीपुरुष कोणताही अपराध नसता क्लेश का सहन करतात? सुधारणावादी आणि बुद्धिवादी आधुनिकांच्या दृष्टीने पाहता ही चित्रे अस्वाभाविक आहेत. निदान प्रगतिविरोधी तरी आहेत. पण प्राचीन कवी आपल्या डोळ्यांपुढे तात्पुरत्या सुधारणा अगर क्षणिक आनंद हा हेतू ठेवीत नसत. मानवी जीवनाचे खोल, गंभीर आणि नितान्त आणि नितान्त वास्तव असे चित्र रेखाटणे हा त्यांचा हेतू असे. हे चित्र बहुधा भीषण व दुःखमयच का असे हे कळण्यास मानवी जीवनातील सुखद आणि दुःखद, उथळ आणि गंभीर, क्षीण आणि तीव्र या भागांचा विचार केला पाहिजे.

        परिचित आणि स्थूल भाषेत सांगायचे झाल्यास, गुणी माणसांच्या आणि सज्जनांच्या वाट्यास दुःखे का येतात? आणि अशा दुःखांच्या कथा आपण इतरेजनांच्या सुखी संसाराच्या आणि सुयशाच्या कथांहूनही अधिक आवडीने का ऐकतो, या दोन प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजे भीषण नाट्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण होय. वास्तविक यातील दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाहून सोपा आहे. पण त्यावरच मराठी टीकावाङ्मयात अधिक चर्चा झाली आहे. 

दुःख चित्रापासून आनंद का व्हावा?

        जे इंद्रियांना अनुकूल संवेदना घडवील ते सुख; आणि जे प्रतिकूल संवेदना घडवील ते दुःख. याहून उच्चतर सुखदुःखांचा ते विचार करीत नाहीत. सज्जनांच्या सौजन्यामुळेच वाट्यास येणाऱ्या दुःखाच्या कथा ऐकून आपणाला एक प्रकारच्या हृदय - विस्ताराचा, एक विशाल सहानुभूतीचा, एका पावक समागमाचा अनुभव घडत असतो. वाङ्‌मयीन आनंद हा पार्थिव सुखासारखा नसून आत्मविकासारखा, हृदयोन्मेषासारखा असतो. दुःखाच्या दृश्यामुळे परिचित अर्थाने 'सुख' होत नसले तरी कोणत्याही विशाल, सत्य आणि खोल अनुभूतीमुळे होणारा ' आनंद ' होत असतो; व म्हणूनच मीलनात, पेयप्राप्तीत आणि सुखप्राप्तीत अन्त पावणाऱ्या पाचव्या अंकाहून डोळ्यांत अश्रूंचे अंजन घालणारे पाचवे अंक मानवी मनावर अधिक शाश्वत अधिराज्य गाजवीत आले आहेत.

           सज्जनांवरील संकटांची चित्रे आपणांस आकर्षित का करतात या प्रश्नांहूनही, सज्जनांवर संकटे का येतात हा प्रश्न अर्थातच अधिक गहन आहे.

आधुनिक मराठी नाट्याचे घराणे

        जीवनाकडे आणि कलेकडे पाहण्याचा भीषण व गंभीर असा एक वेगळा दृष्टीकोणच आहे असे म्हणावे लागते. या भीषण दृष्टीकोणात आणि कलाकृतीत गांभीर्य, आत्यंतितकता, उदात्तता, दैववाद वगैरे अनेक साधारणधर्म असले तरी प्रत्येक श्रेष्ठ कवी आपले म्हणून काही नियन प्रस्थापित करतो. या दृष्टीने प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रीक नाटय, शेक्सपियरनिर्मित निरंकुश नाटय, ग्रीकोत्तर यूरोपमधील फाजील नियनबद्ध नाट्य अशा तीन अवस्था युरोपियन नाटयकलेच्या इतिहासात दिसून येतील. आणि अगदी अर्वाचीन काळात फिरून ग्रीकांच्याच कडक वळणाकडे जाणारे इब्सेनचे तंत्र ट्रॅजेडीची चौथी अवस्था म्हणण्यास हरकत नाही. पाश्चात्य नाट्याच्या या सर्वच स्थितीचा महाराष्ट्रीय नाट्याशी संबंध पोहोचतो असे नाही. 

              प्राचीन पाश्चात्य नाट्यशास्त्राप्रमाणे कालमर्यादा पाळायची म्हटल्यास कोणत्याही नाटकात चोवीस तासांहून अधिक काळात घडणाऱ्या घटना घेता येणार नाहीत. ती वसंतसेनेची कथा असो की शकुंतलेची असो,- चोवीस तासांच्या हकीकतीत जेवढे नाटय समावेल तेवढेच या शास्त्राप्रमाणे ग्राह्य ठरेल, स्थलमर्यादा पाळायची म्हटल्यास शाकुंतलाप्रमाणे एक अंक वनात, तर दुसरा हस्तिनापुरात, तर तिसरा पृथ्वी आणि स्वर्ग यांच्या दरम्यान असे करता येणार नाही. आणि कथानिर्बंध पाळायचा झाल्यास शेक्सपियर - शूद्रक किंवा कोल्हटकर गडकरी यांच्या नाटकांत असतात तशी उपकथानके घालता येणार नाहीत.

        तसेच ग्रीक लोक आणखीही एक निर्बंध कडकपणे पाळीत असत आणि तो म्हणजे ते करूण आणि हास्य यांना एका नाट्यकृतीत स्थान देत नसत. सॉफॉक्लिस हवा असेल तर गांभीर्य आणि भीषणता यांखेरीज काही अपेक्षित येणार नाही; आणि अरिस्टॉफेनीस उघडला तर हास्य आणि उपहास यांखेरीज काही आढळणार नाही!

व्यक्तिमत्त्वाच्या दोन जाती :

        मानवी व्यक्तिमत्त्वाचे दोन नमुने शेक्सपियर कल्पितो. काही मने गंभीर, अतिरेकी आणि दैवला आव्हान देणारी असतात; तर काही साधी, सामान्य, खेळकर आणि मुंगी होऊन साखर खाणारी असतात. या दृष्टीने Tragic Nature म्हणजे 'गंभीर आणि आत्यंतिक वृत्ती' म्हणून एक वेगळा नमुनाच मानावा लागेल. या वृत्तीची माणसे जीवननदीच्या काठावर बसून क्षणभर आनंद करणात समाधान मानणार नाहीत; तर भर पुरात उडी घालण्याचा, पैलतीर गाठण्याचा, भोवऱ्यातही शिरण्याचा यत्न करतील. टॉल्स्टॉय, डोस्टोव्हस्की, तुर्गेनीव्ह यांच्या वाङ्मयातील व्यक्ती अंतिम भवितव्याला जणू बोलावून आणीत आहेत असा भास होतो. अशा मानवी नमुन्यांना गंभीर, खोल, भावनाप्रधान, उतावीळ, महत्त्वाकांक्षी, असंतुष्ट वगैरे काहीही म्हणता येईल; पण एक गोष्ट निश्चित की ते उथळ, अल्पसंतुष्ट आणि भावनाशून्य नसतात. अशा आत्यंतिक व्यक्तींचा विचार ट्रॅजेडी- लेखक करीत असतो. तरीही गंभीर नाट्याचे महत्त्व,'केवळ गंभीर मनाचे चित्र' म्हणूनच असते असे नाही. नाही तर 'ट्रॅजेड' या नाट्यप्रकाराचे  स्वारस्य केवळ स्वभाव - चित्रणापुरतेच मर्यादित राहिले असते. शेक्सपियरच्या ट्रॅजेडीज्ला 'रोमँटिक ट्रॅजेडीज्' म्हणतात, त्याप्रमाणे कित्येकदा 'कॅरॅक्टर ट्रॅजेडीज्' म्हणतात, त्याप्रमाणे कित्येकदा 'कॅरॅक्टर ट्रॅजेडीज्' असेही म्हणतात हे खरे असले, तरी ग्रीक ट्रॅजेडी असो की 'शेक्सपिरियन्' ट्रॅजेडी असो, तिचे महत्त्व केवळ मानसशास्त्रीय नसते. तसे असते तर अलीकडच्या कित्येक विकृत मनोविश्लेषणात्मक चित्रांहून त्यांना अधिक महत्त्व आले नसते. 'ट्रॅजिक' व्यक्तिमत्त्वाइतकाच त्यात 'ट्रॅजिक्' विधिघटनेचाही विचार केलेला असतो. किंबहुना ज्याला ग्रीक नाटककार दैवाचा वा देवतांचा दुर्विलास म्हणून म्हणत, तोही विशिष्ट व्यक्तींच्याच जीवनात आणि विशिष्ट स्वभावगत छिद्रांतूनच प्रवेश करतो, असे दाखविण्याकडे शेक्सपियरचा कल अधिक आहे. अर्थात 'मनुष्यरूप' भक्ष्याशी खेळण्याची दैवरूपी हिंस्त्र शक्तीची तऱ्हा, ग्रीकांहूनही अधिक सूक्ष्मपणे हेरण्याचा व चितारण्याचा शेक्सपियर याने प्रयत्न केला आहे असे म्हणावे लागते. वास्तवतेचे, सृष्टिक्रमाचे, विधिघटनेचे, आणि मानवी मनाचे अधिकाधिक सूक्ष्म व स्पष्ट आकलन आणि चित्रण हा अशा श्रेष्ठ कलेचा विषय असतो. कलात्मक 'अन्तर्दृष्टी' हे तिचे हत्यार असते. जे गवसले ते तर्कशास्त्रात, नीतिशास्त्रात अगर ऐतिहासिक विकासवादात बसते की नाही हे पाहण्याची तिचे निर्माते पर्वा करीत नाहीत. जे दिसले त्यातून आशावाद निघेल की निराशावाद निघेल, याचीही ते क्षिती बाळगीत नाहीत. या सामाजिक हेतुनिरपेक्ष वृत्तीतूनही कित्येकदा काही फायदे मानवी समाज मिळवीत असेल तर मिळवो विचार! अशी त्यांची तटस्थ मुनीची भूमिका असते.

एकच प्याल्या तील दोष :

       स्वैर कल्पनाशक्ती आणि अवखळ कोटिबाजपणा यांनी नाटकाच्या गंभीर कथा - सूत्रावर आणि कोमल रसपरिपोषावर अनेक जागी चाल केली आहे. आणि तरीही इतर नाटकांच्या मानाने गडकऱ्यांनी आपला हा तल्लख आणि अनावर 'वाजी', येथे बराच लगामात ठेवला आहे. शिवाय सर्वसाधारण मनुष्य - स्वभाव आणि विशेषत: प्रस्तुत नाट्य वस्तू यांना धाब्यावर बसवून केवळ कोट्या करणारी गोकुळसारखी पात्रे या नाटकात नाहीत. आणि तरीही मनुष्य अनेकदा यातील बिनतोड विनोदी तत्त्वज्ञानाच्या इतका आहारी जातो की,' मानवी दुःखावर जर काही मानवी तोड असेल तर ती या बेलगाम विनोदी वृत्तीचीच!' असे क्षणभर त्याला वाटल्यावाचून राहात नाही.

               पण विनोदाचे कोमल आणि कठोर असे भिन्न प्रकार कल्पिले पाहिजेत. केवळ कोमल विनोदच काय तो श्रेष्ठ अशी कल्पना करून कित्येक लोक " वन्सं ... तुमची माणसंच भारी अचपळ!" यासारख्या नर्म विनोदातील जनानीपणा म्हणजेच काय तो विनोद, अशी कल्पना करतात. पण आपण आपल्याच मनाचा कानोसा घेतलास कोमलपणा, ध्येयवाद आणि भाविकपणा यांना संभाळता संभाळता जिकीरीला येऊन आपण कित्येकदा तळिरामाच्या वाममार्गाने मोकाट पळू इच्छितो, असे आढळून येईल. तळिरामची ' कृती' करण्याइतके आपण भ्रष्ट झालेलो नसतो; आणि तरी त्याची 'उक्ती' ही मात्र आपणांस जीवनाच्या पेचातून पळवाट वाटते! 

            तरीही नाटकाच्या प्रमाणबद्धतेच्या दृष्टीने पाहता संयमाचा अभाव हा गडकऱ्यांचा प्रमुख दोष होता. आणि त्याचा जन्म त्यांच्या गुणांच्या पोटीच होता. तथापि ज्यांच्या कथानकात अनुभूती, वास्तवता, आणि मानसशास्त्र यांचा मागमूसही नाही, अशांच्या कथानकात ' प्रमाणबद्धता' आहे एवढ्याने त्यांची  गडकऱ्यांशी तुलना होऊ शकत नाही. भावनाप्रधान सात्विक जीव, आपल्या सुखदुःखावर घासून मानवी जीवनाचे जे अर्थ बसवितात, ते गडकऱ्यांच्या नाटकांत पाहवयास सापडतात व हेच त्यांच्या नाटकांचे वैशिष्टय होय; व म्हणून केवळ संयमाभावामुळे त्यांच्या वाङ्‌मयाची पकड कमी होत नाही.

           कित्येकदा अनवधान आणि आळस यांमुळेही प्रस्तुत नाटकात दोष राहिले आहेत. भगीरथ ज्या वेळी सिंधूच्या माहेरच्यांना तार करण्याचे तहकूब करून रामलालला ' काल' चा विषय पुरा करण्याची 'फर्माइश' करतो, तेव्हा स्वाभाविकता आणि प्रेक्षक या दोघांनाही गडकरी यांनी धाब्यावर बसवले, असे म्हणावे लागते, आणि ' होमरही कधी पेंगू लागतो' या युरोपीय म्हणीची आठवण होते! पहिल्या अंकाच्या तिसऱ्या प्रवेशात सुधाकराने 'राणीसाहेबां' तुंबलेल्या रजेसंबंधी केलेली कोटी आजच्या दृष्टीने पाहता ग्राम्यतेच्या सदरात मोडेन. पण त्यासंबंधी फाजील गवगवा करणारांनी सुशिक्षित महाराष्ट्रीयांची सैंपाकघर - माजघरांतील भाषणे आठवल्यास त्या कोटीत आजही वास्तवता आहे असेच त्यास कबूल करावे लागेल.

मराठी नाट्यसंभारात न सापडणारे गुण :

         मराठी नाट्यसंभारात दुर्मिळ असे गुण म्हणजे जीवनानुभूती आणि मानवी हृदयाचे सूक्ष्म ज्ञान, हे गडकऱ्यांच्या इतर नाटकांतही विपुल आहेत; आणि 'एकच प्याल्या' त तर गडकरी भीषण नाट्याच्या खोल पाण्यात प्रभुत्वाने संचार करीत आहेत. गंभीर, वास्तव आणि काव्यमय नाट्य या नात्याने 'एकच प्याल्या' च्या शेजारी बसण्याचे धाडस मराठीत एकही नाटक करीलसे वाटत नाही. या असाधारण भीषण नाट्याची तुलना तत्कालीन सामान्य नाट्यकृतीशी केली गेल्यामुळेच त्या नाटकाची स्तुती आणि निंदा दोन्हीही चुकीच्या दिशेन होत राहिली. गडकऱ्यांच्या काळी गडकऱ्यांच्या काळी गडकऱ्यांनीच गुरुवर्य म्हणून गौरविलेल्या नाटककारांचे दडपण तत्कालीन टीकाकारांवरही असले तर नवल नाही. पण आज पंचवीस - तीस वर्षोनंतरही 'गडकरी आणि एकच प्याला' याकडे नव्या दृष्टीने पाहू नये असे कोण म्हणेल?

            स्वभावप्रधान ट्रॅजेडीत, विशेषतः 'Naturalistic' ट्रॅजेडीत आपण नायकाच्या जागी स्वतःला पाहू लागतो. हॅम्लेटसारख्या जगद्विख्यात नाटकातही हॅम्लेटच्या रूपाने व्यक्तींना व राष्ट्रांना आत्मदर्शनाचा आनंदच लाभला आहे. 'एकच प्याल्या' च्या नायकातही अनेक अपमानित मानी जीवांना आत्मदर्शनाचा आनंदच लाभला आहे. 'एकच प्याल्या' च्या नायकातही अनेक अपमानित मानी जीवांना आत्मदर्शनाचा आनंदच मिळत असावा. पण अखेर 'ट्रॅजेडी' हा वाङ्‌मयप्रकार सर्वांना . सारखाच रुचेल वा समजेल असे नाही.

      Tragic art is for those who are not merely mature,but humanely mature.It does not address itself to the storm-trooper any more than to the sentimentalist.

     बुद्धीने परिपक्क आणि भावनांनी सहानुभूतिपूर्ण असलेल्या वाचकालाय ट्रॅजेडीच्या द्वारे घडविलेल्या मानवदर्शनाचे यथार्थपणे आकलन होईल. एका पाश्चात्य टीकाकाराच्या या मताला आणखी थोडी पुस्ती जोडली पाहिजे. विसाव्या शतकातील मनोविज्ञानाच्या, मानववंश शास्त्राच्या, प्रगतिवादाच्या, मार्क्सवादाच्या कल्पना घट्ट धरून ट्रॅजेडीचा विचार करणारांस, आपापल्या शास्ताला आधार सापडतील, पण ट्रॅजेडीचा जीवनरहस्य मात्र सापडणार नाही. अशी मंडळी 'एकच प्याला' ही सुधाकराची ट्रॅजेडी नसून सिंधूची ट्रॅजेडी होय, असाही अद्‌भुत शोध लावून मोकळी होतील! कारण त्यांना काही शास्त्रांचे आणि प्रगतिवादाचे सिद्धान्त ठाऊक असले, तरी ट्रॅजेडीचेही रहस्य सापडलेले नसते, की जीवनाचेही रहस्य सापडलेले नसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

pritisdeshmukh25@gmail.com

RBFried द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.