संत मेघा उर्फ मेघराज
मराठी सारस्वताचे मंदिर अनेक जैन कवींच्या प्रबंधदीपांनी उजळून निघालेले होते, यासंबंधीची भरपूर व साधार माहिती डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांनी आपल्या 'प्राचीन मराठी जैन साहित्य' या ग्रंथात उपलब्ध करून दिलेली आहे. या देशात प्राचीन काळापासून साहित्याच्या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत. वैदिक साहित्य आणि अवैदिक साहित्य म्हणजेच ब्राम्हण साहित्य आणि श्रमण साहित्य. अवैदिक परंपरा ही अहिंसावादी आहे. वैदिक परंपरा ब्राम्हणप्रामुख्यावर म्हणजेच विषमतेवर आधारलेली आहे. जैनधर्म हा लोकधर्म आहे. त्याने आपले तत्त्वज्ञान लोकांना त्यांच्याच भाषांतून समजावून सांगितले.
सोळाव्या शतकात पदार्पण करताच दृष्टी मेघा उर्फ मेघराज या प्रतिभाशाली व्युत्पन्न पंडितावर केंदित होते. ब्रम्हचारी ब्रम्ह शांतिदासाचा हा शिष्य. गुजराती व मराठी या दोन्ही भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. त्याच्या नावावर १) जसोधर रास २) पार्श्वनाथ भवांतर ३) कृष्णगीत ४) रामायणी कथा ५) गुजरी मऱ्हाटी गीत ६) गोमट स्वामीगीत, इतकी वाङ्मयनिर्मिती नोंदलेली आढळते; पण त्याच्या नामवंत गुणसंभाराचा रम्य आणि भव्य सोहळा जसोधर रासातच पाहावयाला मिळतो. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, कन्नड, तामिळ, हिंदी, गुजराती या भाषांहून जैन कवींकडून गायिल्या गेलेली यशोधराची सुप्रसिद्ध कथा मेघराजाने मराठीतून धर्माच माहात्म्य मराठी भाषिकांच्या मनावर ठसविण्यासाठी सांगितलेली आहे. ५ अधिकार आणि ११६४ ओव्या एवढा मेघराजाच्या जसोधररासाचा विस्तार आहे. कथानक राजगृह नगरीत घडते. तेथे मारिदत्त राजा राज्य करतो. कालिमातेला, चंडमारीला जीवांच्या जोडप्याच्या जसोधररासाचा विस्तार आहे. कथानक राजगृह नगरीत घडते. तेथे मारिदत्त राजा राज्य करतो. कालिमातेला, चंडमारीला जीवांच्या जोडप्यांच्या बळी देण्याचे ठरते. त्यासाठी सहजाचार्यांच्या संघातील नव्यानेच दीक्षा घेतलेल्या अभयरूची व अभयमती या बंधुभगिनींवर बळी जाण्याची पाळी येते. प्रत्यक्ष बळी जाण्याच्या प्रसंगी त्या दोघांचीही शांत वृत्ती पाहून राजा चकित होतो. त्यावेळी अभयमती त्याला आपली पूर्वकथा सांगतो. उज्जैन नगरीत जसौध नावाचा राजा असतो. चंद्रमती त्याची राणी. जसोधर हा मुलगा. अमृतमती ही जसोधराची राणी. पाचशे वधूंनी परीक्षा करून निवडलेली. दुदैव हे की अमृतमतीचे एका कुबड्या कुष्ठरोगी माहुतावरा मन जडते. त्याच्या संगीतावर ते लुब्ध होते. त्यावेळी जसोधर संतप्त होतो; पश्चात्तापदग्ध होतो: कसा? तो स्वतःशीच म्हणतो :
पाहा रे संसाराची युक्ती ।
मी या देशाचा भूपती ।
अर्थ भांडारादि संपत्ती ।
उणे नाही ॥
आणि माझी हे अमृताराणी ।
रूपवंत सुकुलिनी ।
मातें वंचौनि पापिणी ।
कुबडा रतली ॥
हे कुबडे क्रियाहीन ।
अवघ्यापरीस पाहतां हीण ।
आसक्त जाले रांडेचे मन ।
केवि देखा ॥
मरण चिंती मजकारणें ।
कुबडाची भक्ती करू म्हणे ।
ऐसें रांडेचें करणें ।
विचित्र देखा ॥
जसोधर विरक्त होतो. कुटुंबावरील या संकटाचे निवारण करण्यासठी राजमाता चंडमारीला पशू बळी द्यावयाचे ठरविते. राजा जैनधर्मी; त्यामुळे तांदुळाच्या पिठाचा पशू करून त्याचा बळी दिला जातो. यातून दुःख परंपरा निर्माण होते. अमृतमतीराणी जसोधराला आणि राजमातेला विष देऊन ठार करते. यानंतर या दोघांना, मायलेकाला साव वेळा पशू म्हणून जन्म घ्यावा लागतो. अभयरूची आणि अभयमती हा ह्यांचा सध्याचा जन्म. पूर्व संचिताचीच फळे आपण भोगीत आहोत याची जाणीव असल्यामुळे आम्हांला संकटांची भीती वाटत नाही, कोणत्याही कठीण प्रसंगी आमच्या मनाची शांती ढळत नाही असे अभयरूची मारिदत्ताला सांगतो. त्यानंतर मारिदत्त अहिंसा धर्माची दीक्षा घेतो. ही कथा सांगताना कवीने प्रतिबिंब आणि विलोम या पद्धतींचा उपयोग केलेला आहे. कथेच्या अखेरीकडून आरंभाकडे वाचकांस नेलेले आहे. चंडमारीच्या देवळात बलिदानासाठी उभा असलेला अभयरूची म्हणतो :
रावो जसोधरू आणि ।
चंद्रमती त्याची राणी ।
तेही पिठाचे कुकडे म्हणोनि ।
देवीपूजा केली ॥
तेणें पापेंकरूनि ।
पावली दुःखाची खाणी ।
ते वृत्तांत तूं चित्त देऊनि ।
परिसये राया ॥
हिंसेची आवड असलेल्यांना कवी म्हणतो :
माझी कथा पाप नासती ।
केवळ धर्माते भासती ।
ते तुम्हा हिंसकांप्रति ।
केवि रुचे? ॥
न रुचे श्रोतयांते कथा ।
आणि वेलोवेला सांगे वक्ता ।
वृथा घडे वीकलीया सेता ।
नीर जैसे ॥
पंडित आणि काव्यकौशल्य या गुणांचा त्रिवेणीसंगम मेघराजाच्या या 'जसोधररासा' त साधलेला आहे. प्राणिवध तर पाप आहे, प्राण्याचे निर्जीव प्रतीक करून त्याचाही बळी देण्यात पाप आहे. हे मेघराजाला लोकांच्या मनावर बिंबवावयाचे आहे. समग्र काव्यात अहिंसा, सत्य, ब्रम्हचर्य व अपरिग्रह या गुणांच्या माहात्म्यावर भर दिलेला आहे.
आता जैनधर्मु वरी ।
व्रते विधाने आचरी ।
त्याविन सवंसारी ।
सुटिका नाही ॥
मराठी भाषेची कवाची जाण उत्तम आहे; काव्य रचना सामर्थ्या बद्दलही त्याला आत्मविश्वास आहे; तरीही त्याने विनयशील वृत्ती धारण करून आपल्याकडे कमीपणा घेतलेला आहे :
नेनु मी मऱ्हाटे बोलणें ।
नेनु वोवीचे बंधने ।
अक्षर होय अधिक उणें ।
तें नेनवे मज ॥
पार्श्वनाथ भवांतर :
४७ कडव्यांचे गीत. तेविसावे तीर्थकर भ. पार्श्वनाथ यांच्या भवांतराचे वर्णन करणारे,
कृष्णगीत :
रुक्मिणी, सत्यभामा व जांबुवंती या श्रीकृष्णाच्या राण्या त्याच्याशी संवाद करीत आहेत ही भूमिका घेऊन ७६ कडव्यांची तीन गीते रचलेली आहेत.
रामायणी कथा :
राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे दशरथाला प्रत्येकी एकेक गूढ कथा सांगतात अशी ही रचना आहे.
गुजरी - मऱ्हाडी गीत :
एक गुजराथी व एक महाराष्ट्रीय अशा दोन स्त्रिया गिरनारला नेमिपूजा करण्यास निघाल्या आहेत. रस्ता एकपावली आहे. पुढे कोणी चालावे? यावर दोघींत भांडण सुरु झाले. दोघी एकमेकींची निंदा करितात, त्या निंदेतून दोन्ही समाजांच्या चालीरीतीये चित्र आपोआप उमटले आहे. दोहींनी मिळून न भांडत भक्ती करावी असा कवीचा उपदेश आहे.
गोमटस्वामी गीत :
अवघे तीन कडव्यांचे. गोमटेश्वराची यात्रा केल्यानंतर स्वरचलेले
जैनांचे हे मराठी वाङ्मय धार्मिक वाङ्मय आहे, परमार्थाचे संस्कार करणारे वाङ्मय आहे; पण धर्म, परमार्थ अध्यात्म ही वाङ्मयाच्या श्रेष्ठतेची कसोटी होऊ शकते काय? कोणतेही वाङ्मय पारमार्थिक आहे म्हणून साहित्यिक दृष्टीने उच्च कोटीचे आहे असे म्हणता येणार नाही असे मत डॉ. अक्कोळे यांनी 'प्राचीन मराठी साहित्या' त 'प्राचीन मराठी जैन साहित्याचे वाङ्मयीन परिशीलन' करताना मांडलेले आहे. जीवन आणि वाङ्मय यांत द्वैत उभारण्याचा उद्योग सांप्रत विशेष प्रतिष्ठा पावलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
pritisdeshmukh25@gmail.com