संत अलमखान


        

         


           मराठीतले मुसलमानी संत

मुसलमान मराठी संतकवी मुख्यतः संत आहेत. संतत्व हा त्यांचा प्राण आहे. कवित्व हा त्यांच्या संतत्वाने धारण केलेला देह आहे. ईश्वरी लीलेच्या गुणानुवादातील अलौकिक आनंदाचा महाराष्ट्रावर वर्षाव करण्यासाठी ते अवतरलेले होते. महाराष्ट्राच्या पारमार्थिक वाङ्‌मयाच्या दलनाची शोभा त्यांच्या वाङ्‌मयीन कार्यामुळे निश्चितच वाढलेली आहे. मराठी संत कवींच्या स्फुट रचनेप्रमाणे या मुसलमानी संतांचीही स्फुट रचना ही मधुर, प्रसादपूर्ण आहे.

                   अलमखान हे विंध्याद्रीपलीकडील महापूर नामक गावचा राहणारा. चौघे भाऊ. हा सर्वांत धाकटा भाऊ, म्हणून सर्वात जास्त लाडका; पण लहानपणापासूनच प्रपंचाविषयी शून्य आस्था. एकदा त्याची थोरली भावजय डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन येत होती. हा रस्त्यात तीर मारण्याचा खेळ खेळत होता. चुकून त्याचा तीर भावजयीच्या डोक्यावरील घड्याला लागला. आपल्या हातून अयोग्य वर्तन घडले याचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याच्या मानसिकतेला विरक्तीचा जबरदस्त तडा गेला. त्याने घर सोडले. कर्नाटकातल्या कल्याणीजवळच्या जंगलात राहू लागला. तेथे कोणा रामनृपतीला त्याने परचक्रापासून वाचविले. या राजाने त्याला आपल्याजवळ सन्मामाने ठेवले. वैभवात हा राहात असतानाही त्याची वृत्ती विरक्तच होती. पुढे वडवाळ सिद्ध नागेशांनी त्याला तेथे संन्याशाच्या रुपाने दर्शन दिले. दर्शन देऊन अदृश्य झाले. नागेशांनी पुन्हा तसेच दर्शन दिले. त्यांच्या आदेशाप्रमाणे अलमखान मुगळी येथे राहून भजनात भग्न राहू लागला. मुसलमानांनी त्याच्यावर निंदेचा प्रहार सुरु केला. 'तयासी म्लेंच्छी निंदिती ।

हा का करितो अशी भक्ती ।

काय ओंगळ आमुची स्थिती ।

येणे रीती सोडली ॥

सूफी पंथाच्या कादरी शाखेतील दस्तगिरीच्या फकिरांनी त्याचा छळ केला. पायात तप्त बेडी घालून दाखविण्याचा चमत्कार करून दाखविल्यानंतर त्याचा छळ बंद झाला. नंतर त्याने करळी क्षेत्री समाधी घेतली. मुगळी येथे अलमखानाची प्रसादसमाधी आहे. अलमखानाचा गुरु वडवाळ नागेश सिद्ध यांचे मुसलमानात नसरूद्दीन नाव रूढ होते असे म्हणतात. 

          अलमखानाची वाङ्मयनिर्मिती ही पदरचनारूप आहे. त्याची अवघी पंधरा पदे उपलब्ध आहेत. गुरु नागनाथाच्या कृपेमुळे आपल्या मनाचे मनपण कसे गेले आणि त्यामुळे आलेल्या स्वानंदाच्या पुरात आपण कसे बुडून गेलो हे त्याने एका पदात वर्णिलेले आहे.

आज मोठा आनंद झाला माय ।

माझा मज भेटला गुरुराय ॥

कर्मदृष्टी करिता अवलोकन |

तेणे गेले मनाचे मनपण ॥

द्रष्टा दृश्य दर्शन एक झाले ।

मीतूंपण सहज मावळले ॥

खिन्न झाली त्रिपुटी जया ठायी ।

तेंचि भरलें दिसे अंतर्बाह्यीं ॥

स्वानंदाचा भरपूर लोट झाला ।

ततक्षणी अलमखान बुडाला ॥

ليست هناك تعليقات:

pritisdeshmukh25@gmail.com

صور المظاهر بواسطة RBFried. يتم التشغيل بواسطة Blogger.