संत शहामुनी
शहामुनी हे ' सिद्धान्तबोध ' या महाराष्ट्रातील भाविकांत विशेष लोकप्रिय असलेल्या ग्रंथाचा कर्ता. भीमा - सरस्वती संगमाजवळील पेडगाव हे त्याचे जन्मस्थान. जन्म सुमारे इ. स. १७४८ मधला. मूळ नाव शहा हुसेन. याचे घराणे चार पिढ्यांपासून हिंदू देवदेवतांच्या भजनी लागलेले. आपण मुसलमान कुळात जन्मलो याचे याला होणारे दुःख त्याने 'सिद्धान्तबोध' त स्पष्टपणे मांडलेले आहे.
नव्हे यातीया ब्राम्हण ।
क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।
शूद्रापरीस हीन वर्ण ।
अविंधवंशी जन्मलो ॥
ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा ।
म्हणती महाराष्ट्र धर्म खोटा ।
शिवालये मूर्ति भंगिती हटा ।
देवद्रोही हिंसाचारी ॥
जयांच्या सणाच्या दिवशी ।
वधिता गो उल्हास मानसी ॥
वेदशास्त्र पुराणांसी ।
हेळसिती उद्धट ॥
ऐसे खाणीत जन्मलो ।
श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।
तुम्हां संतांचे पदरी पडलो ।
अंगीकारावे उचित ॥
शहामुनी हे एकाजनार्दनासारखे गुरुशिष्यांचे जोडनाव आहे. तोच स्वतः सांगतो :
कोणी घेईल मुनीची कल्पना ।
मुनिनाम गुरुचे जाणा ।
तयाचे कृपेने रचना ।
या ग्रंथाची होतसे ॥
दत्तत्रेयाचे अनुग्रहीत असलेले मुनीन्द्रस्वामी हे शहमुनीचे गुरु. दत्तात्रेयाचा मुसलमानांशी वरचेवर संबंध आलेला दिसून येतो. मुनीन्द्रस्वामींनी शहामुनीला गुरुदीक्षा वाराणसीला गंगातीरी दिलेली आहे. त्यावेळचे वर्णन करताना शहामुनीने लिहिलेले आहे.
वाराणसीत गंगातीरी ।
प्रहर रात्र लोटल्यावरी ।
आयुष्यमान् योग रेवती नक्षत्री ।
अनुग्रह केला स्वामीने ॥
नाही पाहिले यातीकडे ।
ज्ञान सांगितले उघडे ।
अवघे उगविले कोडे ।
सोडिले बिरडे अविद्येचे ॥
मंत्र फुंकोनि कर्णी ।
दीप लाविला हृदयीभुवनी ॥
गेली भ्रांति निरसोनि ।
स्वये प्रकाशलो स्वरूपी ॥
ब्रम्हास्मि ठसावला बोध ।
आनंदाचाही फुंद ।
जिरोनि केला निवांत ॥
शहामुनी हा पराकोटीचा गुरुभक्त आहे. आपल्या ग्रंथरचनेचे सर्व श्रेय त्याने गुरुकृपेला दिलेले आहे. त्याने 'सिद्धान्तबोध' हा ग्रंथ सातारा जिल्हयातील पठारीमंडळ येथे रचला.
शहामुनी हा संप्रदायाने महानुभावी -
१) त्यांच्या अनुयायांच्या विद्यमान घराण्यातील मंडळी महानुभाव महंताकडून उपदेश घेतात.
२) त्याचा 'सिद्धान्तबोध' हा ग्रंथ महानुभावांच्या संग्रहात सापडतो.
३) 'सिद्धान्तबोध' त त्याने ब्रम्हा,विष्णू,महेश यांना गौण स्थान दिले आहे.
४) 'सिद्धान्तबोध' त महिंभट व परमेश्वर ( श्री चक्रधर ) यांच्या संवादातून महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान विस्तारपूर्वक मांडलेले आहे व अद्वैत मताचे खंडन केलेले आहे.
५) कृष्ण व दत्त यांना त्याने उपास्य दैवत मानलेले आहे.
६) अव्यक्त, हंस, दत्त, कृष्ण व चक्रधर या पंचकृष्णांना त्याने नमन केलेले आहे.
महानुभाव तत्त्वज्ञानाचे एवढे दृढ संस्कार शहामुनीच्या मनावर झालेले असूनही, ज्या 'सिद्धान्तबोधा' च्या पूर्वार्धात त्याने महानुभावीय द्वैती तत्त्वज्ञान मांडले आहे त्याच्याच उत्तरार्धात अद्वैतवादी तत्त्वज्ञानाचा मोकळ्या मनाने तोंडभरून त्याने पाठपुरावा केलेला आहे. अद्वैत खरे, भेद मिथ्या असे त्याने निःशंकपणे सांगितलेले आहे.
या ग्रंथाचे हे निजबीज ।
समान पाहणे समाधिशेज ॥
अव्दयबोधी संतोषिजे ।
या सिद्धान्ती 'मी ब्रम्ह'॥
अद्वैतबोधी समाधिसुख ।
ज्यांत निमग्न सनकादिक ॥
हेंचि वर्म गीतेंत वदला वैकुंठनायक ।
वेदमनीचें नवनीत ॥
सर्प वाकडा तिकडा फिरत ।
वारूळात नोट उतरत ।
तैसा कवी बहु प्रकारें वदत ।
शेवटी सिद्धान्त अद्वैतचि ॥
म्यांही 'सिद्धान्त बोधा' त ।
लिहिला मतभेद द्वैत बहुत ।
शेवटी अद्वैत बोधाची मात ।
बेरीज केली एकचि ॥
'सिद्धान्त बोधा' त एकूण अध्याय ५० आहेत. ओवीसंख्या ९८५८ आहे. रचनाकाल इ.स. १७७८ हा आहे. "मराठी भाषेतल्या पहिल्या प्रतीच्या ग्रंथांत मोडण्यासारखा हा ग्रंथ आहे, पण आमच्या अरसिकतेमुळे त्याचे योग्य स्थान त्याला अद्याप मिळाले नाही. भिन्नभिन्न पुराणांतल्या उत्कृष्ट कथा, रामायण भारतातील सुंदर आख्याने अति संक्षिप्त तर्हेने, मोठ्या मार्मिकपणाने व शब्दरचना अति समर्पक, अति सुबोध व अत्यंत प्रासादिक करून सारा ग्रंथ श्रेष्ठ नीतिततत्वांनी व वेदान्त विचारांनी विणून काढला आहे. याची रचना इतकी सुबोध व चित्ताकर्षक आहे, याची मांडणी एखाद्या साध्या गद्य ग्रंथाइतकी सहज व सरळ झालेली आहे की गंगेच्या ओघाबरोबर जसे पुष्प झरकन वाहात जावे, त्याप्रमाणे अंतःकरण याच्या अस्खलित विचार प्रवाहाबरोबर वाहात जाते. या ग्रंथात चित्त भारून टाकणारे,अन्य व्यवसायांची पुरी विस्मृती पाडणारे व आपल्या दिव्य प्रभेने दशैंद्रियांची एकतानता करणारे असे अद्भुत सामर्थ्य आहे की त्याचे यथार्थ वर्णन वाणीला करिता येत नाही. तात्पर्य मराठी वाङ्मयाच्या खाणीतला हा एक अत्यंत तेजस्वी हिरा आहे व 'जरी उकिरड्यात पडला मळला न हिरा तथापि सामान्य' या पंतांच्या उक्तीप्रमाणे मराठी वाचकांनी जरी याची किंमत केली नाही तरी याची प्रभा याच्या सन्निध जाणाऱ्याला दिपविल्याशिवाय राहणार नाही."
खुद्द आजगावकरांनीही या अविंधाच्या ग्रंथावर मनःपूर्वक स्तुतिसुमने उधळली आहेत: "शहामुनीची वाणी इतकी रसवती, स्पष्टभाषिणी, प्रासादिक आहे की तिच्या तेजस्वितेमुळे वाचकांचे मनश्वक्षू दिपून गेल्याशिवाय राहात नाहीत. कवीची विद्वत्ता मोठी अगाध होती असे दिसत नाही; पण त्याच्या वाणीचे तेज इतके उज्ज्वल आहे की केवळ परमेश्वरी प्रसादाचिच ते फल होय.
शहामुनीने ज्ञानदेवादी संतांबद्दल भक्तिभाव व्यक्त केला आहे. पंढरी, पांडुरंग यांचे महिमान गायिलेले आहे. कबीराला त्याने गुरुस्थानी मानलेले आहे -
ऐसा कबीर जगी धन्य ।
मातें स्वप्नी दिले दर्शन ।
तोही गुरु माझा पूर्ण ।
जपे त्यासी अहर्निशी ॥
हिंदू - मुसलमानांतील द्वेषाच्या निरसनाबद्दल त्याला विलक्षण तळमळ लागलेली आहे, आणि ती त्याच्या ग्रंथात ठायी ठायी विस्तारपूर्वक व्यक्त झालेली आहे. सर्वोतर्यामी असलेल्या परमेश्वराच्या स्मरणाने हा द्वेषभाव नष्ट व्हावा अशी त्याची सत्त्वशील अपेक्षा आहे. जन्मजातीवरून एखाद्याला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरविणे किती मूर्खपणाचे आहे हे पटवून देण्यासाठी त्याने एक मार्मिक प्रश्न विचारलेला आहे :
देवाची भक्ती चोखामेळा करी ।
त्यास लोक धरिती दुरी ।
वैकुंठी महारवाडा वेगळा करी ।
नांदावया तयासी? ।
उंच नीच नदीत शिरोन ।
बाहेर निघती कुंभ भरोन ।
मग म्हणती स्पर्शो नको चलो दुरोन ।
उदकांत उभयतां उभी होती ॥
"अल्ला, जीजस, विष्णू ही सर्व एकाच परमेश्वराची नावे आहेत आणि वेद व कुराण यांचा वक्ता एकच आहे" हा खरा परमार्थ विचार त्यांनी व्यक्त केला.
शहामुनीने हिंदू धर्माची दीक्षा घेतली. मुनीन्द्राचे शिष्यत्व पत्करले. नंतर महानुभाव पंथात प्रवेश केला. कबीरालाही गुरु मानले. ह्या सगळ्याचा विचार करता,तो हिंदु मुसलमान या भेदाच्या पलीकडे होता असे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते.
शहामुनी यांच्या वाङ्मयशिल्पातील रमणीय असा भाग : आपल्यालाही एक स्त्री मिळावी अशी इच्छा नारदाने श्रीकृष्णजवळ व्यक्त केली. त्यावेळी नारदाची नारदी झाली व त्यामुळे त्याची जी विटंबना झाली.
भावे लोटांगण श्रीकृष्णचरणा ।
पूर्ण ब्रम्हा तू सनातना ।
तुजवाचून अन्य भावना ।
धरिता वैखरी दुखंड ॥
हाच निश्चय तुझ्या पायी ।
धरावया मज सामर्थ्य नाही ।
तुझी कृपा जाहलिया पाही ।
तरीच जाईल सिद्धीते ॥
नारदे तुजशी धरिला अभिमान ।
म्हणे मी ब्रम्हा तुजसमान ।
तुझे माझे एकचि ज्ञान ।
भिन्न भेदाभेद असेना ॥
तू सर्व भोगून अलिप्त ।
मीही पापपुण्यातील ।
सोळा सदस्त्र अंतःपुरात ।
एक समर्पी मज भार्या ॥
हासोनि बोले मेघश्याम ।
नारदा तू ज्ञानी परम ।
तुझिया ठायी नाही विषम ।
समभावे बोलसी ॥
सोळा सहस्त्र अंतःपुरी ।
ज्या गृहीं नसेन मी कंसारि ।
तेच तुझी मुख्य अंतुरी ।
समर्पिली यथार्थ ॥
कृष्णआज्ञा जाहलियावरी ।
नारदासि हर्ष परम अंतरी ।
गायनाचे शिखा पिंजरी ।
आल्हाद हृदयी न समाय ॥
म्हणे 'वीणा आता कासयाला ।
फेडिली कौपीन पीतांबर नेसला ।
वस्त्रभूषणीं शृंगारला ।
हरुषें चालिला कृष्णसदनी ॥
सिध्दान्तबोधा' च्या ३६ ते ३९ या अध्यायांत शहामुनीने भगवद्गीतेवर संक्षिप्त भाष्य केलेले आहे.
नाही लिहिला विस्तार ।
सोडिला नाही बीजांकुर ।
श्रीते समजोत चतुर ।
दूषण न ठेवावे कवीते ॥
मागे टीका फार जाहली ।
पुढती होतील भविष्याकाळी ।
गीतासिंधू माउली ।
किती मेघ उपसिती ।
एका दीपी अनेक दीप लाविती ।
परी उणी नव्हे दीपज्योति ।
तेवी गंगेच्या अर्थी ।
अगाध अर्थ भरलासे ॥
शर्करेच्या गिरीसी ।
काय नेतील मुंग्या गृहासी ।
तैसे गोतेच्या अर्थासी ।
किती एक कवी वदतील ॥
'सिद्धान्तबोध' या ग्रंथाचे सार -
शूरपणाचे हेची फळ ।
गाळावा अभिमान प्रबळ ।
सर्वासी बोलावे मंजुळ ।
त्यांत बरे हरी करी ॥
आपण असल्या निष्कपट ।
कुबुद्धीचे होय तळपट ।
जैसा भजनाचा उठल्या लोट ।
पापाचा ठाव उरेना ॥
सर्वोभूती पहावा भगवंत ।
हेंचि ईश्वराचे मनोगत ।
या बोधें साधुसंत ।
मुक्त असती संसारी ॥
सोडोनि निंदा स्तवन ।
जनी पहावा जनार्दन ।
हे सज्जनाचे श्रेष्ठ गुण ।
ज्यांत संतोषे जगदात्मा ॥
मुसलमान संतकवीपैकी ग्रंथकार ही प्रतिष्ठा मिळविण्याइतके खास कर्तृत्व शहामुनी यांचे आहे. शहामुनी रचित 'सिद्धान्तबोध' हे ग्रंथ पटकन आत्मीयतेने उचलून घेता येईल. पारमार्थिक प्रबोधनाच्या पात्रतेच्या कसोटीस हे ग्रंथ निश्चित उतरतील इतके ते संतदृष्टीने महत्त्वाचे आहेत.
ليست هناك تعليقات:
pritisdeshmukh25@gmail.com