मन्मथस्वामी
मन्मथस्वामी ही वीरशैवधर्मातील एक प्रभावशाली व्यक्ती; मराठीतील वीरशैव वाङ्मयात मोलाची भर टाकणारी. शांतलिंग आणि एकनाथ यांच्याशी समकालीन असलेली. मराठवाड्यातील बीड जिल्हयातील नेकनूर गावी इ. स. १५६० मध्ये याचा शिवभक्त कुटुंबात जन्म झालेला. एकांतवासासाठी निवडलेल्या कपिलधारक्षेत्री त्याने इ. स. १६१३ मध्ये समाधी घेतली. कपिलधार हेच त्यांचे निवासस्थान व ग्रंथरचनास्थान होते. नागेश हे मन्मथस्वामीचे गुरु, असे सांगण्यात आले आहे. गुरु नागेश हे वडवाळसिद्ध नागेशाहून वेगळे आहेत. त्यांनी आपल्या 'परमरहस्य' या ग्रंथाच्या आरंभीच्या भागात म्हटले आहे :
अनामतु अपरंपार ।
श्रीगुरुमूर्ती नागेश्वर ।
नागेश हे आडनाव दातार ।
एऱ्हवी अनाम तू ।
ग्रंथ संपविताना त्याने लिहिलेले आहे :
यालागी शिव तोचि नागेश्वरू ।
तोचि बसवराज श्रीगुरु ।
माणूर पट्ट सिंहासनाधिकारू ।
असे जयासी ॥
त्याचिया कृपेकरून ।
परमरहस्याची टीका विस्तारून ।
करविते झाले आपण ।
श्रीबसवराजस्वामी ॥
यावरून मन्मथाच्या गुरुसंबंधी पुढील अनुमाने निघतात :
▪️ गुरुचे सांप्रदायिक नाव - नागेश्वर
▪️ त्यांना श्री बसवराजही म्हणत असावेत
▪️ आडनाव दातार
▪️ माणूस मठातले अधिकारी
मन्मथस्वामीच्या नावावर पुढील ग्रंथनिर्मिती नोंदलेली आढळते.
▪️ परमरहस्य
▪️ मन्मथगाथा
▪️ ज्ञानबोध
▪️ अनुभवानंद
▪️ स्वयंप्रकाश
यांपैकी परमरहस्य आणि मन्मथगाथा या दोनच ग्रंथांचा जरी परिचय करून घेतला तरी मन्मथाच्या विचारांची व भावनांची ओळख होण्यासारखी आहे.
परमरहस्य :
परमरहस्य या ग्रंथाचे नाव परमरहस्य की परमरहस्यसारामृत की परमरहस्यामृत असा वाद आहे. शिवपार्वतीसंवाद असे समग्र ग्रंथाचे स्वरूप आहे. हा स्वतंत्र ग्रंथ नसून टीकाग्रंथ आहे. असे मन्मथाने प्रत्येक अध्यायाच्या समाप्तीच्या वेळी सांगितलेले आहे :
इति श्री परमरहस्य सारामृत ।
उमामहेश्वर संवादी वर्तत
त्याची टीका करोनी प्राकृत ।
कृतकृत्य मन्मथ ॥
पहिल्या अध्यायात सुरवातीलाच त्यांनी एका ओवीत म्हटले आहे :
ऐसे विनवोनि भूमि विन्यासी माथा ।
तव कृपा आली श्रीगुरुनाथा ।
म्हणती वरू दिधला तत्वता ।
टीका करी परमरहस्याची ॥
संस्कृत श्लोक आणि त्याच्याखाली ओवीबद्ध मराठी टीका. अशी या ग्रंथाची मांडणी आहे. पण मूळ ग्रंथ कोणाचा याची माहिती उपलब्ध नाही. परमरहस्य दे मूळ गंथाचे नाव; तो रेवणसिद्धाचा असण्याची शक्यता आहे. वीरशैवधर्माचे तत्त्वज्ञान आणि त्याचा आचारमार्ग यांची सर्वांगीण माहिती देणारा हा ग्रंथ निश्चितच महत्त्वाचा आहे. वीरशैवाचे तत्त्वज्ञान हे अद्वैताचेच तत्त्वज्ञान आहे. पदोपदी ज्ञानदेवाच्या तत्त्वज्ञानाची आठवण करून देणारे आहे. लिंगपूजा आणि गुरुपूजा यासंबंधी जो तपशिलासह आचारधर्म यात सांगितलेला आहे तो मात्र खास वीरशैवांचा आहे. एख्ही जे आत्मज्ञान ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे तेच वीरशैवांनाही आहे. वीरशैवधर्मात आत्मज्ञानाला प्रधान स्थान आहे हे मन्मथाने तत्कालीन विविध प्रकारच्या गुरुच्या लीलांच्या वर्णनाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेले आहे :
हे गुरु नाना मते दाविती ।
एक ते तीर्थाटना धाडिती ।
एक ते पाषाण पूजविती ।
नाना दैवत ॥
एक ते तपा धाडिती ।
एक ते करकमळी घालविती ।
एक ते धूम्रपान साधचिती ।
पंचाग्नि ताप एक ॥
एक लौकिक कर्मे करविती ।
एक ते वायूसी झुंझावे घेवविती ।
सोळाव्या शतकातील तथाकथित परमार्थातली ही गुरुचरित्रे आजही काही प्रमाणात क्रियाशील अवस्थेत सापडण्यासारखी आहेत. आत्मज्ञान ही परमार्थाची खरी खूण आहे हे मन्मथाने सांगितले आहे :
परि एका आत्मज्ञानावाचून ।
ते सर्वहि अकारण ।
जव नव्हे एक चैतन्य धन ।
तव सर्व साधने व्यर्थ ते ॥
या ग्रंथातून मांडलेल्या तत्त्वज्ञानाची आणि पुरस्कारिलेल्या आचारमार्गाची थोडी कल्पना यावी म्हणून त्यातील काही ओव्या...
तरंग क्षीरसागराचा ।
भंगता न भंगे सागरचि साचा ।
तेवि देह भंगता न भंगे ब्रम्हीचा ।
ब्रम्ह पुतळाचि तो ॥
स्वये स्वरूप होणे आपण ।
नाही कियाकर्म बंधन ।
सोहंसिद्धी सदा सावधान ।
तेचि मुक्ति पद पावती ॥
जरि राजा स्वप्नी मोळीविक्या झाला ।
तरी राजपदा काय मुकला ।
नीद्रेस्तव भास जो भासला ।
तो लटिका नसताचि ॥
तैसे लटकेचि बद्ध ते बांधले पण ।
ते सत्यत्व भासे संकल्पे जाण ।
तो गुरुकृपे संकल्प गेलिया निमोन ।
मग कोण बद्धमुक्त म्हणे ॥
ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान याहून काही वेगळे आहे काय ? ज्ञानाला कर्माची जोड पाहिजे; वडील ज्ञानी माणसांनी समाजाला मार्ग दाखवून देण्यासाठी स्वत: धर्म पाळला पाहिजे असे मन्मथाचे सांगणे आहे :
तारि क्रियेविण जे पुण्य ।
ते सुकृतासी होय उणे ।
म्हणोनि न टाकिजे सज्जने ।
क्रियाचारासी ॥
वडील अग्रगण क्रिया टाकिती ।
तरी नेणतेही तैसेचि वर्तती ।
म्हणून न टाकीजे अधिक स्थिती ।
वाढविजे सज्जनी ॥
खरा वीरशैव हा अहिंसा पाळतो, शांत, दयाळू व क्षमाशील असतो, विरक्त असतो, निंदास्तुती - मानअपमान या द्वंद्वाच्या अतीत राहतो.
शंकर म्हणे अंबेप्रती ।
तुझा प्रश्न आचार्य उत्पत्ती ।
शिवधर्म असे अनादिसिद्ध स्थिती ।
त्याची उत्पत्ती न वर्णवे ॥
प्रथम सांगेन आचार्य नाम ।
पुढे कथिन अवतार ग्राम ।
महानुभावांना जसा कृष्ण, वारकऱ्यांना जसा विठ्ठल, समर्थसांप्रदायींना जसा राम, तसा वीरशैवांना शिव. शिवधर्म अनादिसिद्ध आहे. जैंपासून शिव आहे तैंपासून शिवधर्न आहे. शिवधर्माच्या अनादित्वाचे, त्याच्या प्राचीन आचार्याचे व त्यातील बसवेश्वराच्या कार्याचे वर्णन करताना मन्मथाने लिहिले आहे.
'परमरहस्या' तली वाङ्मयीन गुणवत्ता ही काही थोड्या रुपकांच्या, दृष्टान्तांच्या रूपाने साकार झालेली आहे; पण रसिकभ्रमराला लुब्ध करून टाकील अशा रसमयतेचा वा कल्पनाप्रिय वाचकाला चकित करून सोडील अशा चमत्कृतिपूर्ण अलंकारमयतेचा तिच्यात अभाव आहे. भाषा, साधी, सरळ आहे; प्रसंगविशेषी आवेशपूर्णही झाली आहे; पण ललित्याचे वेधक विभ्रम तिला अविदित आहेत.
'परमरहस्य' वाचून वीरशैवधर्मसापेक्ष तत्त्वज्ञानाची आणि आचारधर्नज्ञानाची भूक भागविली जाते; पण काव्यरसाची तहान अतृप्तच राहते. मन्मथाचे अभंग वाचल्यानंतर मन प्रसन्न होते; ती तहान शांत होते. त्याच्या भावमय व्यक्तित्वाचे उत्कृष्ट प्रतिबिंब त्याच्या अभंगात पडलेले दिसून येते. त्याचा प्रत्येक अभंग शिवशक्तीच्या आतुर, उत्कट जिव्हाळ्याने ओथंबलेला आढळून येतो. शिवभक्तीचा आग्रह व अन्य देवताभक्तीचा निषेध मन्मथाच्या अभंगांतूनही आढळतो.
ज्ञानबोध :
ज्ञानबोध हा अलीकडे श्री. अनिलकुमार बडवे यांना एका बाडात उपलब्ध झालेला मन्मथाचा ग्रंथ. लहानसाच. अवघा १४३ ओव्यांचा. गुरुशिष्यसंवाद अशा पद्धतीने रचलेला. सुरवातीला ईश्वरवंदन, गुरुस्तवन न आढळता एकदम
आता नारोपू ज्ञानबोध ।
गुरु शिष्य संवादु ।
ऐकताचि परमानंदु ।
श्रोतिया होय ॥
असा प्रारंभ केलेला आहे. या ओव्यांचा क्रमांकही असाच आहे. कदाचित आधीच्या प्रकरणातून देवतवंदन, गुरुनमन येऊन गेले असावे. हे पुढले प्रकरण असावे. 'ज्ञानबोध' हा दुसऱ्या एखाद्या मोठ्या ग्रंथाचा भाग असावा. ज्ञान, अज्ञान, वैराग्य, भक्ती, तत्त्वमसिविवरण, त्वंपद, असिपद, संताचा महिना इ. विषय या ग्रंथात आलेले आहेत. ज्ञानाचे लक्षण गुरु शिष्याला सांगत आहे.
प्रपंचाचे नीरसन
करोणि जाणिजे आत्मखुण ।
तया नाव ज्ञान । जाण पुत्रा ॥
पींड ब्रम्हांडाचा झाडा ।
करोणि पाहिजे नीवाडा ।
मग जे जाणिजे पुढां ।
तया नवा ज्ञान ॥
संतमहिम्याचे वर्णन करिताना दयेने लक्षण कवीने पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे :
जैसी ठेच लागता आंगोष्टीयासी ।
जळ येत जैसे डोळीयासी ।
तैसा दुखावे देखोनि दुःखितासी ।
त्या नाव दया ॥
ही ओवी व इतर काही ओव्या विचारात घेऊन या ग्रंथावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव पडलेला आहे असे मत श्री. अनिलकुमार बडवे यांनी मांडलेले आहे.
मन्मथांचे भारूड :
मन्मथ भारूडातही रंगलेले आहेत, पण दोन जोहार आणि एक जोशी एवढया तीन पदांपुरता. ही भारूडे श्री गुरुचन्नबसवस्वानी मठ संस्थान कसबे बर्दापूर, जि. बीड यांच्या 'ॐ नमः शिवाय' ग्रंथमालेतील 'शिवभजनामृता' त प्रसिद्ध झालेली आहेत. " जोहार मी मायबाप जोहार । मी आत्माराम पाटलाचा महार" हा पहिला जोहार. १२ कडव्यांचा. दुसऱ्या १४ कडव्यांच्या जोहारात मन्मथ कैलास नगरीचा महार झालेला आहे. " आशा मनीषा कल्पना । दंडावे इंद्रिया मना ।";असे केले तर आत्मसुख प्राप्त होईल; अन्यथा " जे आचारा भंगले । त्यास लाधने दुःख जाणा की मायबापा ।" असा सदुपदेश आहे. मन्मथाचा जोशी भविष्य वर्तविणाराच आहे. भविष्यकथन करताना त्याने अभक्तांचा धिक्कार केलेला आहे आणि शिवभक्तीच्या महिम्याचा पुरस्कार केलेला आहे.
मन्मथाच्या काही अभंगांत ' मन्मथ शिवलिंग' असा नामोल्लेख आहे. हा शिवलिंग कोण! असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मन्मथाच्या वडिलांचे नाव शिवलिंग; त्यामुळे मन्मथ शिवलिंगाचे जे अभंग आहेत ते मन्मथाचेच समजणे, हे या प्रश्नाचे एक उत्तर आहे. शिवलिंग मन्मथाचा एक शिष्य; तेव्हा मन्मथ शिवलिंग या नावाने असलेले अभंग या शिवलिंगाचे असतील असेही दुसरे उत्तर देणे शक्य आहे.
लिंगेश्वर :
मन्मथगाथा या पुस्तकात मन्मथाखेरीज लिंगेश्वर, बसवलिंग, महादेव, लक्ष्मण व शिवदास यांचेही अभंग दिलेले आहेत. त्यांपैकी लिंगेश्वर हा मन्मथशिष्य शिवलिंगाचा शिष्य. त्याचे ४० अभंग उपलब्ध आहेत. संसाराचा उबग येऊन आपण सद्गुरूला शरण गेलो असे तो एका अभंगात सांगतो.
ليست هناك تعليقات:
pritisdeshmukh25@gmail.com